आशियाई क्रीडा स्पर्धा, भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अतिशय दमदार सुरुवात करत आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ पदकांची कमाई केली. नेमबाजी, नौकानयन, महिला क्रिकेट, मुष्टियुद्ध आणि हॉकी अशा विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंनी विजय मिळवत देशाच्या पदकतालिकेत ५ पदकांचा समावेश केला. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर संपूर्ण देशभरातून स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय खेळाडूंच्या या पराक्रमाचे कौतुक केले आहे. क्रीडा प्राधिकरणानेही या सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

चीनमधील हानझोऊ इथं आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आजच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात केली. नेमबाजीच्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात महिला संघाने भारताला पहिले रौप्य पदक मिळवून दिलं. मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसी यांनी या संघाचे नेतृत्व केले. तर १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रमिताने कांस्य पदकावर नाव कोरले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

महिला क्रिकेटमध्येही भारताने चमकदार कामगिरी केली. बांगलादेशाला ८ गडी राखून हरवत भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. पुरुषांच्या नौकानयन स्पर्धा प्रकारात भारताने दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.

 

दुसरीकडे महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत निखत झरीन या भारतीय खेळाडूने व्हिएतनामच्या गुयेन हिचा ५-० असा पराभव केला. तर हॉकीमधे भारताच्या पुरुष संघाने उझबेकिस्तानचा १६-० असा एकतर्फी खेळ करत पराभव केला. या विजयामुळे भारताला ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *