राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय फायदा सर्वच राजकीय पक्ष उठवू पाहात आहेत. ओबीसी, मराठा, धनगर, कुणबी अशा विविध समाजघटकांनी आरक्षणासाठी मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. हजारोंनी समाजबांधव रस्त्यावर उतरत आहेत. स्वाभाविकच याचा राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनीही बाह्या सरसावलेल्या दिसत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी विदर्भातील हा पहिला एल्गार मोर्चा होता. माजी गृहमंत्री, मनसुख हिरेन हत्या प्रकरण व १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर असलेले आमदार अनिल देशमुख यांनी बैलबंडीवर बसून स्वार होऊन या एल्गार मोर्चाचे नेतृत्व केले.
ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी निघालेला हा एल्गार मोर्चा होता. शेकडो शेतकऱ्यांचा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चात समावेश होता. हातात निरनिराळे फलक घेऊन घोषणाबाजी करत ढोल ताशाच्या गजरात हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चाचा शेवट करत विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.