भोगावती सांस्कृतिक मंडळ, कसबा तारळे
कोल्हापूर… कोल्हापूर म्हणले की समोर येतात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ऊस शेती, साखर कारखाने व दूधदुभत्यानं समृध्द असलेला जिल्हा… महाराष्ट्रातील असा जिल्हा की ज्याचं दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. पण या नाण्याची एक दुसरीही बाजू आहे. कोल्हापूरच्या सात डोंगराळ तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या वाड्या वस्त्या यांची स्थिती याच्या अगदी उलट आहे.
ही बहुतांश ठिकाणं पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्यांवर अवलंबून आहेत आणि केवळ भात, नाचणी, वरी अशी पावसाळी पिकं घेतली जातात. साहजिकच त्यामुळे उत्पन्न कमी आणि पावसाळ्यानंतर रोजगारासाठी होणारं स्थलांतर ठरलेलं. स्थानिक तरूण नोकरी धंद्यासाठी पुणे, कोल्हापूर अशा शहरांकडे वळल्यामुळे गावं ओस पडली. बऱ्याच वाड्या वस्त्यांमध्ये आज केवळ वयस्कर मंडळी, महिला व लहान मुलं आहेत. राधानगरी तालुक्यातील अशीच अवस्था असलेल्या कसबे तारळे आणि दुर्गमानवाड या गावांच्या पंचक्रोशीमध्ये भोगावती सांस्कृतिक मंडळ कार्यरत आहे आणि या प्रश्नांना समर्पक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचे शिष्य, पुण्यपुरुष श्री हरीबुवा यांचे समाधीस्थळ असलेलं… भोगावती नदीच्या सुरम्य किनारी वसलेलं…
निसर्गाचं वरदान लाभलेलं… शांत… कसबे तारळे गाव आणि परिसर…
शेतीप्रधान असलेल्या या परिसरात शिक्षणाविषयी देखील जागरूकता आहे. असे असले तरी वाहतूक आणि शिक्षणासारख्या मुलभूत सोयींपासून वंचित होता. परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी १२-१५ किलोमीटर चालावे लागत असे. पावसाळ्यानंतरच्या पाण्याचा प्रश्नही मोठा होता.
आणीबाणीच्या काळात पुण्यातील येरवडा कारागृहात अटकेमुळे एकत्र आलेल्या कोल्हापूरमधील काही संघ कार्यकर्त्यांनी या भागात सेवाकार्य उभे करण्याचे ठरवले. आणि कारागृहातून सुटल्यावर कै. श्रीराम ठाकूर, कै. दिगंबर फडणीस, कै. दत्तात्रय पोतदार, कै. विठ्ठल पाटील, कै. रामचंद्र तेली या मंडळींनी “भोगावती सांस्कृतिक मंडळ, कसबा तारळे” संचालित विद्यार्थी वसतिगृहाची १९७८ साली स्थापना केली. माध्यमिक शिक्षणासाठी दुर्गम गावांमधून दररोज चालत येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कसबा तारळे येथे मोफत निवास व्यवस्था उभी राहिली.
संस्थेचे कार्यकर्तृत्व फुलवले ते कै. काका आठवले यांनी. बँक ऑफ महाराष्ट्र येथून निवृत्त झाल्यावर, पुण्यातील कै. पुरुषोत्तम शिवराम तथा काका आठवले यांनी, सर्व शहरी सुखसोयी सोडून, विनावेतन पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्विकारली.
१९८० ते १९९५ या १५ वर्षात प्रेमाने आणि परिश्रमाने फुलवलेल्या या रोपट्याला काकांच्या पश्चात त्यांचेच नाव देण्यात आले.
पहाटे साडे पाच पासून सुरु होणार्या वसतिगृहाच्या आखीव-रेखीव दिनक्रमात, सूर्यनमस्कार, प्रार्थना, अभ्यास, खेळ, मनोरंजन, अभ्यासपूरक उपक्रम, सहल अश्या सर्वच बाबींचा समावेश विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरतो. प्रसंगानुरूप मान्यवर व्यक्ती, शैक्षणिक शंकानिरसनासाठी शिक्षक येथे नियमित येत असतात. कसबा तारळेच्या आसपास असणाऱ्या दुर्गम वाड्यावस्त्यांमधील गरजू व होतकरू विद्यार्थी या वसातीगृहात राहून शिक्षण घेत आहेत.
वसतिगृहाचे काम स्थिर झाल्यानंतर, भोगावती सांस्कृतिक मंडळाने, कसबा तारळे व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रमांकडे, कार्यक्रमांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. संस्थेतर्फे गावांमधे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करणारे श्रद्धा जागरण कार्यक्रम सुरु झाले.
दिंडी सोहळा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णाष्टमी असे कार्यक्रम परिसराची परंपरा बनले.
गावकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही सामाजिक उपक्रम देखील सुरु आहेत. स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार, व्यवसाय मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे उपक्रमही परिसरात प्रसिद्ध आहेत. विज्ञान वाहिनी, पुणे या संस्थेच्या सहयोगाने विद्यार्थ्यांच्या विविध वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणारी कार्यशाळेचे तसेच ताणमुक्त अभ्यासासाठी मनशक्ती केंद्रातर्फे कार्यशाळेचे आयोजन होत असते.
काळाची गरज ओळखून तारळे पंचक्रोशीतील लोकांच्या गरजा व समस्या जाणून घेण्यासाठी २०२० मधे पुण्यातील सेवावार्धिनी संस्थेतर्फे ९ ग्रामपंचायती व १५ वाड्यावस्त्यांचे RRA – Rapid Rural Appraisal म्हणजे आवश्यकता पडताळणी सर्वेक्षण केले. त्यानुसार स्थानिक गरजा ओळखून काही ठोस योजना सुरु झाल्या.
निसर्ग संपन्न भाग असून देखील येथील गावकऱ्यांना पाण्यासाठी मात्र कष्ट उपसावे लागत होते. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सेवावार्धिनी तर्फे जलदूत उपक्रम उभा राहिला.
डोंगर उतारावरील वाहते पाणी थांबून राहण्यासाठी वृक्षारोपणाचे कामही हाती घेतले.
या परिसरात पडसाळी गावाजवळ एक देवराई आहे. या देवराईत अनेक प्रकारच्या वनस्पती तर आहेतच, शिवाय महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचा अधिवासाही आहे.
येथे श्रमसंस्कार शिबिरांद्वारे पर्यावरण संरक्षण व देवराई संवर्धनाचा उपक्रम सुरु केला. आज या उपक्रमाला शासनाचेदेखील सहकार्य लाभत आहे.
भोगावती सांस्कृतिक मंडळाने ग्रामविकास प्रकल्पही सुरु केले. दुर्गम भागातील गावकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांचे जीवनमान उंचावले जावे, हा त्यामागचा हेतू. शहराला गावाशी अधिक परिणामकारक रीतीने जोडण्याच्या उद्देशाने, ग्राममैत्रीअंतर्गत स्थानिक फळांची रोपे लावण्यात आली. त्यातून गावकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशी योजना केली. शेती मार्गदर्शन, सेंद्रिय परसबाग मार्गदर्शन, ग्रामीण पर्यटन तरूण शेती व्यावसायिकांसाठी फायद्याचे ठरले.
तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनकल्याण समितीच्या सहकार्याने, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती शिबीर घेण्यात येते. तरुणांचा आत्मविश्वास वाढण्यात अशा उपक्रमांची मोलाची मदत होते.
प्रवासी साधने आणि आरोग्य सुविधांचा अभाव या बाबी सुरुवातीपासूनच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जाणल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विषयातही संस्थेने कामास सुरुवात केली. गावागावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिरांद्वारे, गरजेनुसार चष्म्याचा नंबर काढून दिला जातो, मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास मोफत व्यवस्था केली जाते.
येथील गावांचा आधार ठरलेल्या डॉक्टर तुमच्या गावी हा फिरत्या रुग्णालयाचा उपक्रम अतिशय जिव्हाळ्याचा ठरला आहे. घरोघरी हिंडून फिरते डॉक्टर गावात आल्याचे सांगण्यापासून ते डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे, औषध देणे, आरोग्य विषयक सल्ले देणे, अश्या सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात. या कामामधे आता गावकरी देखील आनंदाने सहभागी होतात. गेल्या अडीच वर्षात, १७ गावांमधील दोन हजार लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
अश्या विविध उपक्रमांतून कसबे तारळे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांना भोगावती सांस्कृतिक मंडळ मोठा आधार वाटते. संस्थेच्या या चढत्या वाढत्या आलेखात आता मोठ्या प्रकल्पांचीही भर पडते आहे.
संस्थेच्या याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणजे दुर्गमानवाड येथील संकल्पित भोगावती क्रीडा व कृषि प्रशिक्षण केंद्र…!
आपल्या अनेक संकल्पित उपक्रमांना मूर्त रूप देण्यासाठी संस्थेनं दुर्गमानगड इथं स्वतःची अडीच एकर जागा घेतली आहे. इथं अद्ययावत क्रीडा व कृषी प्रशिक्षण केंद्र येथे उभे राहत आहे. यामध्ये –
महिला प्रशिक्षण, विद्यार्थी निवास, आरोग्य शिबिरे यांसाठी आवश्यक असे १००० स्क्वेअर फुटांचे बहुउद्देशीय सभागृह, विविध विषयांवरील ५०० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचनालय आणि रीडिंग रूम, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, OPD, विविध संस्थांच्या सहकार्याने भरवण्यात येणारी आरोग्य शिबिरे यांकरिता लागणारे वैद्यकीय सुविधा केंद्र, देखील बांधले जात आहे.
– स्थानिक मुलां-मुलींसाठी खास भारतीय खेळांचे क्रीडासंकुल सुरू करण्यात आले आहे.
– तालुकास्तरीय वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
– माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी व दिवाळी सुट्टीकाळात कबड्डी, खो-खो, योग यांसाठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.
– पोलिस भरती, सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन वर्ग भरवणे.
इत्यादी उपक्रमांसाठी येथे उभे राहत असलेले अद्ययावत असे क्रीडा प्रशिक्षण केंद्र वैशिष्ट्यापूर्ण ठरणार आहे.
दुर्गमानवाड परिसरातील १० गावांमधील महिला-युवतींसाठी कृषी प्रक्रिया आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन, तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठीचे प्रशिक्षण देखील या केंद्रात दिले जाणार आहे.
– नाचणी, वरी, जांभूळ. फणस प्रक्रिया केंद्र,
– स्थानिक कृषी मालापासून बिस्किटे, बेबी फूड, पापड, सत्व, सरबत, चूर्ण, जाम, इत्यादी पदार्थांच्या निर्मिती व पकिंगचे प्रशिक्षण,
– शासकीय, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विक्री व्यवस्थेसाठी तसेच विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, असे कार्यक्रम येथे घेण्यात येणार आहेत.
किमान ३० व्यक्तींच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी अतिथी कक्ष आणि भोजनगृहाची व्यवस्था येथे असणार आहे.
असे हे दुर्गमानगड येथील अद्ययावत क्रिडा व कृषी प्रशिक्षण केंद्र परिसराच्या उन्नतीसाठी वरदानच असेल.
कसबा तारळे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा विश्वास, सक्रीय सहभाग भोगावती सांस्कृतिक मंडळाचा मोठा ठेवा आहे.
संस्थेच्या वाटचालीत मोरया हॉस्पिटल-कोल्हापूर, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय इचलकरंजी, मनशक्ती प्रयोग केंद्र-लोणावळा, रोटरी क्लब कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सेवावार्धिनी पुणे, सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, रा.स्व.संघ-जनकल्याण समिती, स्थानिक शासकीय यंत्रणा, वन्यजीव विभाग-महाराष्ट्र शासन, अश्या अनेक संस्थांचा आणि व्यक्तींचा सहभाग आणि सहकार्य आहे.
१९७८ मधे काही ध्येयनिष्ठ मंडळींनी रुजवलेला सेवाकार्याचा वेल आता विविध शाखांनी बहरत आहे. संस्थेच्या संकल्पित प्रकल्पांना आर्थिक हातभार लावण्यासाठी भोगावती सांस्कृतिक मंडळ, कसबा तारळे, आपल्याला आवाहन करीत आहे.
शिक्षण, ग्रामविकास, आणि आरोग्य या त्रिसुत्रीसाठी सेवाभाव, ध्यास, सत्कृती आणि भक्तीने उभे राहिलेले हे दुर्गम भागातील कार्य आपल्या सर्वांच्या सहाकार्याने अविरत चालू राहील अशी खात्री आहे.
– आमोद खळदकर