स्व. मालिनी राजूरकर यांना विनम्र श्रद्धांजली !
एक खूपच वाईट बातमी कानावर आली… स्व. मालिनीबाई राजूरकर आपल्याला सोडून गेल्या. हो, मालिनीबाईच. अनेक ज्येष्ठ त्यांचा उल्लेख ‘मालिनीताई’ असा करत असतील, पण आमच्या पिढीच्या दृष्टीने त्या आमच्या आईच्या वयाच्या. आणि त्यांचं गाणंही अतिशय समृद्ध आणि पोक्त. महान विदुषी. जसं, पूर्वीच्या काळचे लोक हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, सरस्वतीबाई राणे, केसरबाई केरकर यांचा उल्लेख आदराने करत असत, तसंच ज्यांच्या विद्वत्तेमुळे, ज्यांच्या गायनामुळे आणि ज्यांच्या वागण्यामुळे कमालीचा आदर वाटतो त्या मालिनी राजूरकरांनाही ‘मालिनीबाई’ असंच म्हणावसं वाटतं. किंबहुना जसं फक्त ‘पंडितजी’ म्हणलं की डोळ्यासमोर पं. भीमसेन जोशी उभे रहातात, ‘बुवा’ म्हणलं की पं. जितेंद्र अभिषेकी डोळ्यासमोर येतात, तसंच आमच्या घरी नुसतं ‘बाई’ असं म्हणलं की विदुषी मालिनीबाई राजूरकर यांचीच मूर्ती उभी राहते.
माझ्या पिढीतल्या अनेक जणांप्रमाणेच मालिनीबाईंचं गाणं ऐकण्याची माझी सुरुवात त्यांचा बागेश्री, मालकंस, भीमपलास आणि अलूरकरांनी काढलेल्या एकाच कॅसेटमध्ये असलेल्या आठ रागांच्या बंदिशी ह्यापासून झाली. मला वाटतं, त्यांची मी ऐकलेली पहिली मैफल सवाई गंधर्वमध्ये त्यांनी बागेश्री गायला होता ती. तत्पूर्वी काही जणांचा ऐकल्यामुळे ‘सखी मन लागेना’ हा ख्याल तसा ओळखीचा झाला होता. पण यांच्या गाण्यात काहीतरी नक्की वेगळंच आहे असं तेव्हा जाणवलं आणि अर्थातच ते गाणं खूपंच आवडलं. नंतर सवाईमध्येच त्यांचा मालकंस, अहिर भैरव, त्यांचा अजरामर झालेला मारुबिहाग, भैरवी इत्यादि अनेक राग ऐकले आणि त्यांच्या असंख्य भक्तमंडळींमध्ये मीही सामील झालो.
सगळ्यांचं एक निरीक्षण सारखं आहे, की बाई विदुषी असल्या तरी वागायला अगदी साध्या, तुमच्या आमच्या आईसारख्या. पूर्वी एका प्रसिद्ध मंडळासमोर गणेशोत्सवात त्यांचा कार्यक्रम ऐकला. जवळजवळ एक तास त्यांनी भूपाचा ख्याल रंगवला आणि हा ख्याल कधी संपूच नये असं तेव्हा वाटत होतं. मध्यांतराला आपली मान दुखत आहे असं जाणवलं तेव्हा लक्षात आलं की, संपूर्ण पूर्वार्ध जराही हालचाल न करता बसल्यामुळे ही स्थिती झाली होती. फक्त मीच नाही तर सबंध श्रोतृवर्ग असाच संपूर्णपणे स्तब्ध राहून, मंत्रमुग्ध होऊन त्यांचं गाणं ऐकत होता. मध्यांतरात स्वतःभोवती चेल्यांचा, शिष्यांचा घोळका नसून त्या एकट्या एका साध्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्यादिवशी त्यांच्या साथीला असलेले तानपुरे फार चांगले नव्हते. त्यांनी याविषयी तक्रार केली नाही. मात्र, थोड्या दिवसांनी तिथेच श्रीमती शोभा गुर्टू यांचं गाणं होतं हे कळल्यावर मात्र म्हणाल्या, “शोभाताईंना नाही हं चालायचं असं. चांगले तानपुरे आणून ठेवा.” बर अशी गैरसोय असताना उत्तरार्धात काहीतरी छोटसं गाऊन मैफल गुंडाळल्ये वगैरे भानगड नाही. उत्तरार्धातला मल्हार जणू लोकांना समजावून सांगत होत्या. गायन साथीला अनेक शिष्या, अमुकच प्रकारचे तंबोरे असा बडेजाव त्यांनी कधीही मिरवला नाही. किंबहुना, इलेक्ट्रॉनिक तंबोरे आल्यानंतर अनेक गायकांच्या कार्यक्रमात वेळ कमी असल्यामुळे त्या केवळ इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्यांवरही गात असत, इतक्या त्या प्रागतिक विचारांच्या होत्या.
अशीच एक मैफल कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील. मैफलीच्या आधी बाहेर झुंबड उडली होती. तिकिटं संपली आहेत असं सांगूनसुद्धा लोक हलायला तयार नव्हते. आम्ही पूर्ण तिकीट काढू, आम्हाला नाट्यगृहात किमान खाली तरी बसून द्या किंवा पूर्ण नाट्यगृह भरल्यावर बाहेरच्या जागी बसून एक साधा स्पीकर लावायची तरी सोय करा अशी विनवणी करत असंख्य प्रेक्षक तिथे थांबले होते. शेवटी मालिनीबाईंशी बोलून संयोजकांनी आणि नाट्यगृहाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा निर्णय घेतला आणि या संगीतासाठी आसुसलेल्या प्रेक्षकांना अतिशय उत्तम गाणं ऐकायला मिळालं. बाईंनी त्या संध्याकाळी मारवा गायला. ज्यांना वसंतरावांचा काळजाला हात घालणारा मारवा ऐकायची सवय आहे त्यांना तो काहीसा आक्रमक वाटला आणि मध्यांतरात त्याबद्दल एकमेकांत कुजबूज झाली. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं की संगीताच्या ग्रंथांमध्ये मारवा ह्या रागाचा वीररसप्रधान म्हणून उल्लेख आहे. तो आज बाईंनी साकार केला.
असंच एका वर्षी सवाई गंधर्वमध्ये बाईंचा आवाज खूपच बसला होता. तब्येतही फारशी बरी नव्हती. पण आलेल्या रसिक प्रेक्षकांना नाराज करायचं नाही आणि कर्तव्य म्हणून जे गायचं ते उत्तमच गायचं ह्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी मालकंस केवळ अप्रतिम मांडला. तार सप्तकातल्या षड्जापर्यंतच त्या दिवशी त्यांचा आवाज जात होता. तरीही मध्य सप्तक आणि काही अंशी मंद्र सप्तक यांमधून त्यांनी जो मालकंस उभा केला त्याचं दुसऱ्या दिवशीच्या बहुसंख्य वृत्तपत्रांमध्ये समीक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं.
बाईंचं गाणं मला आवडण्यामागचं एक कारण म्हणजे, त्या गात असलेला राग सगळा वेळ जाणवत रहातो आणि परिचयाचा होतो. ‘रञ्जयति इति राग:’ या व्याख्येला सार्थक करत पहिल्या काही क्षणातच श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊन शेवटपर्यंत रमवत रहातो. नंतर असं कळलं की, हे ग्वाल्हेर घराण्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्वाल्हेर घराण्याची वैशिष्ट्यं असलेले टप्पा, टप् ख्याल, त्रिवट हे दुर्मिळ आणि अवघड प्रकारही त्या अत्यंत लीलया आणि रसाळपणे सादर करत असत. ग्वाल्हेरच्या महाराष्ट्र आणि ग्वाल्हेर शाखांमधला फरक वगैरे आपल्याला काही कळंत नाही, पण अवघड मींड हे मूळच्या गायकीचं वैशिष्ट्य आहे असं म्हणतात. बाईंच्या तोडीतल्या ‘लाल मनावत’ या ख्यालातील समेवर येण्याची मींड अशी आहे, की ती घेणं अनेक दशकं उत्तम तालीम आणि मेहनत घेतलेल्या गायकांनाही अवघड जावं. तसंच, त्यांच्या अभोगीतल्या ख्यालातील मींड इतकी सुंदर आहे, की श्रोते मंत्रमुग्ध होऊन जावेत. त्या सरगम इतकी सुंदर गात, की भेंडीबाजार घराण्यातल्या गायकांनी म्हणावं “हे तर आमचंच.” बरं, त्यात कुठेही स्वतःची विद्वत्ता दाखवणे किंवा कौशल्याबद्दल टाळ्या मिळवणे अशी भावना नसे. केवळ त्या रागाचं आणि सरगमचं सौंदर्य प्रेक्षकांसमोर मांडणं हीच त्यांची भावना असे.
चिजांची श्रीमंती हे ग्वाल्हेर घराण्याचं अजून एक वैशिष्ट्य. बाई तर ह्या बाबतीत खूपच श्रीमंत होत्या. लोकप्रिय बंदिशी, अनवट बंदिशी यांबरोबरच त्या अगदी प्राथमिक स्तरावर शिकवल्या जात असलेल्या बंदिशी, कधी कधी लक्षणगीतंही गात आणि त्या वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवंत. त्यांनी ज्या ज्या विद्वानांकडून ह्या चिजा घेतल्या होत्या, त्यांचा त्या अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करत असत.
शास्त्रीय संगीतातलं शब्दांचं आणि भावना व्यक्त करण्याचं महत्त्व हा एक परंपरागत चर्चेचा विषय. बाईंची शब्दोच्चाराची एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण पद्धत होती. तीही गाणं अधिक रंजक करत असे. भावपरिपोषाविषयी तर का बोलावं? मारुबिहागातील ‘शुभ दिन आयो आज’ ऐकताना श्रोत्यांना काहीतरी मंगलकार्य आहे आणि आपणही भरजरी कपडे घालून आलो आहोत असं वाटावं. झिंझोटीतली ‘सखी मेरो मन में’ ऐकताना एखादी नवयुवती आपल्या भावना प्रिय सखीला सांगत आहे असं वाटावं. एकदा सवाईत पहाटे त्या अहिर भैरव गायल्या. पहाटेची वेळ आणि त्याच वेळेला पती आळसावल्याचं ‘अलसाये…’ ह्या बंदिशीतलं वर्णन. एरवी त्यांच्या दोन बोटांवर डोलणारा संपूर्ण श्रोतृवर्ग अगदी गंभीर झाला होता. भैरवीतल्या भावनांच्या तर किती छटा! कधी भक्ती, कधी शृंगार, कधी विरह, कधी रुखरूख. ‘ना मारो फुल गेंदवा’ वेगळी आणि स्वत:ला बजावणारी ‘साध रे मन षड्ज अपना’ वेगळी.
मागच्या पिढीतील ज्येष्ठ लोक जसं “आम्ही या कानांनी तरुण भीमसेन, कुमार, मल्लिकार्जुन, चंपूताई, केसरबाई, मोगूबाई यांचं गाणं ऐकलंय” असं सांगतात, तसंच आम्हीही आमच्या मुला नातवंडांना “आम्ही या कानांनी, समोर बसून बाईंचं गाणं ऐकलंय.” असं नक्कीच सांगू.
बाईंच्या संगीत प्रवासात त्यांच्या साथसंगतकारांचं स्थान अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांचा उल्लेख बाई अतिशय सन्मानपूर्वक करत असत. मी ऐकलेल्यांपैकी श्री. भरत कामत, सुभाष कामत, डॉ. अरविंद थत्ते, सुयोग कुंडलकर, केशवचैतन्य कुंटे अशा अनेक साथीदारांनी त्यांना उत्तमोत्तम साथ करून आमच्यावर लक्ष लक्ष उपकार करून ठेवले आहेत.
काही दिवसांपूर्वी बाईंची एक जुनी मुलाखत ऐकली. त्यावेळी त्यांनी संगतकारांबरोबरचे आपले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांचं आपल्या गाण्यातलं बरोबरीचं स्थान याविषयी अतिशय मौलिक विचार व्यक्त केले होते. त्याचबरोबर त्या निष्काम कर्मयोगाच्या साधक असल्याप्रमाणे असंही म्हणल्या होत्या की, “एवढं काम या जन्मात करून ठेवलं आहे, उरलेलं पुढच्या जन्मात करू.” बाईंना सद्गती मिळो आणि लक्ष लक्ष श्रोत्यांवर उपकार करण्यासाठी त्यांना उत्तम गायिकेचा किंवा गायकाचा जन्म मिळो आणि त्यांनी आमच्या पुढील पिढ्यांनाही असंच उपकृत करावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करून त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.
– निखिल देव,
७ सप्टेंबर २०२३