सायकल वारी आज नाशिक मुक्कामी

पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भागवत धर्माची पताका फडकावून ही सायकल वारी मार्गस्थ झाली. विठ्ठलाची शक्ती आणि नामदेवाची भक्ती आपल्याला बळ देवो, अशा शुभेच्छा शिंदे यांनी व्यक्त केल्या.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी यांच्या वतीने आयोजित रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यंकांत भिसे, धर्मवीर अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले आदी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षांपासून पंढरपूर ते घुमान सायकल वारी सुरू आहे. मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे ती पोहोचणार आहे. ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यांतून प्रवास करणार आहे. या वारीत १३० सायकलस्वार आणि ५० भजनी मंडळे सहभागी झाली आहेत.
एकनाथ शिंदे यांनी साधला सायकलस्वारांशी संवाद
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या सायकल वारीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व माहिती जाणून घेतली. इतक्या मोठ्या प्रवासात तुम्हाला विठ्ठल भगवान ताकद देईल. परंतु प्रत्येकाने आरोग्याच्या घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी सायकलस्वारांना केले. सुमारे वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ शिंदे यांनी आयोजक आणि सायकलस्वारांशी संवाद साधून त्यांचे मनोबळ वाढविले.
ही सायकल वारी वेळापूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, आळेफाटा, संगमनेर मार्गे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नाशिकला पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी या सायकल वारीचे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
पुण्यात शीख बांधवांनी केले स्वागत
सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोहळा पुण्यात दाखल झाला. हडपसरला शिंपी समाज बांधवांनी तर पुण्यात शीख बांधवांसह राजस्थानी छीपा समाज बांधवांनी टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात सायकल वारीचे स्वागत केले.
आळंदीत संत भेट सोहळा
मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजता संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या रथयात्रेसह सायकल वारी श्री क्षेत्र आळंदीत पोहोचली. आळंदी संस्थानचे वतीने विश्वस्त चैतन्य महाराज कबीर व व्यवस्थापक माऊली वीर यांनी यात्रेचे स्वागत केले. संत नामदेव महाराज यांच्या पादुका संत भेटीसाठी माऊली समाधी मंदिरात आणण्यात आल्या. पादुकांची विधीवत पूजा करुन माऊली व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
आज सोहळा नाशिक मुक्कामी
मंचर येथे नामदेव शिंपी समाजाच्या वतीने सर्व यात्रेकरूंना भोजन प्रसाद देण्यात आला. दुपारी सोहळा आळेफाट्याकडे मार्गस्थ झाला. आळेफाटा येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तर ओतूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने भोजन देण्यात आले.
आज सोहळा नाशिक मुक्कामी
घारगाव येथे चंदन घुले यांच्या वतीने सर्व सायकल रायडर्सना न्याहारी देण्यात आली. संगमनेर येथे नामदेव शिंपी समाजाच्या वतीने भोजन प्रसाद देण्यात आला. दुपारी सोहळा नाशिक मुक्कामी मार्गस्थ झाला.

