समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज

भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन

सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.

भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख धर्माचे सार; मातृशक्ती’ या पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदरे होते.

सर्वसमावेशक, सहिष्णू हिंदू जीवनपद्धतीच्या आधारे आपल्या पूर्वजांनी विविध क्षेत्रात अलौकिक कार्य केले. अध्यात्मात रुजलेली लोकशाही सामाजिक लोकशाही बळकट करण्यास सक्षम झाली. सर्व मार्गांचा समान स्वीकार करणारी परंपरा केवळ हिंदू तत्त्वज्ञानात आहे. मात्र परकीय आक्रमणाच्या काळात आपली जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू झाले. वर्णात जाती नव्हत्या तर जातीत वर्ण होते. समरस जीवनाची परंपरा हजारो वर्षे आपण जोपासत आलो आणि त्यात निर्माण होत गेलेले दोष दूर करण्याचे काम वेळोवेळी संतांनी केले. त्या त्या वेळी वेगवेगळे पंथ तयार झाले. मात्र आता या पंथांना त्यांच्या मूळ हिंदू परंपरेपासून तोडण्याचे काम होत आहे. प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणारा समाज ‘वेगळा धर्म’ म्हणून तोडला जातो आहे. सर्वांनी अभ्यासपूर्वक या षड्यंत्राला तोंड दिले पाहिजे. आपल्यातील सामाजिक समरसता व्यवहारात प्रकट झाली पाहिजे. आता हिंदू जागा होतो आहे. इतिहासाच्या संदर्भहीन मांडणीतून विकृती निर्माण केली जात आहे. सर्वच स्तरावर व्यापक जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय विचार साधनाच्या पुस्तकांचा प्रसार केला पाहिजे. असे आवाहन प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.

कार्यक्रमाला जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर, भारतीय विचार साधनाच्या संपादिका विनिता हिरेमठ, शिवदेव स्वामी उपस्थित होते.

संस्कार भारतीच्या “सौहार्द” प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला. ईश्वर रायण्णवर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजयकुमार माने यांनी आभार मानले.

साहित्य भारतीची सांगली शाखा :
साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय विचार घेऊन काम करणाऱ्या ” साहित्य भारतीच्या” सांगली शाखेचे उद्घाटन याप्रसंगी झाले. नूतन कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ कवी डॉ विजयकुमार माने, डॉ. व्यंकटेश जंबगी, डॉ. अंजली गोखले यांना जिल्हा संघचालकांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *