
मुंबई, दि. १५ : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.
या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

