
जोधपूर, ०४ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक ५ ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान जोधपूरमधील लालसागर येथे होणार आहे अशी माहिती रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला संघ प्रेरित ३२ संघटनांचे अधिकारी तसेच महिलांच्या कार्याचे समन्वय पाहणाऱ्या कार्यकर्त्या उपस्थित असणार आहेत. या बैठकीत एकूण ३२० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बैठकीला परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन लाभणार असून, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे आणि सह-सरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपाल, सी.आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये, आलोक कुमार आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आंबेकर पुढे म्हणाले, बैठकीत विविध संघटनांचे वार्षिक कामकाजाचे कार्यवृत्त सादर केले जाईल, ज्यामध्ये वर्षभरातील अनुभव आणि कामगिरीचा तपशील असेल. यामध्ये विशेषतः अभाविप, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, विद्या भारती आणि दिव्यांगांसाठी कार्य करणारे सक्षम यासारख्या संघटनांचा समावेश आहे. देशातील विविध क्षेत्रांची, विशेषतः पंजाब, बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील जनजातीय भागांची सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर देखील चर्चा केली जाणार आहे. यासोबतच पंच परिवर्तन – सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण अनुकूल जीवन, “स्व” आधारित रचना आणि नागरिक कर्तव्य पालन यासारख्या विषयांवर देखील चर्चा केली जाईल.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वर विविध संघटनांनी केलेल्या कामाचा आढावा तसेच शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यावर बैठकीत मंथन करण्यात येईल. जनजातीय समाजात होत असलेले सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही आढावा घेतला जाईल. यासोबतच, आगामी शताब्दी वर्षासाठी (२०२५-२६) कार्यक्रमांच्या रुपरेषेवर देखील चर्चा होणार आहे असेही ते म्हणाले. २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीला नागपूरपासून सुरू होणारा हा उत्सव मंडल, ग्राम आणि वस्ती पातळीपर्यंत स्वयंसेवकांकडून गणवेशात साजरा केला जाईल. शताब्दी वर्षात देशभरात हिंदू संमेलन, गृहसंपर्क, सद्भाव बैठका, प्रमुख नागरी चर्चासत्रे व युवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
ही बैठक कोणत्याही निर्णयासाठी नसून चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि संघटनांमधील समन्वयासाठी असते. येथे प्राप्त विचार आणि प्रेरणेवर आधारित, प्रत्येक संघटना स्वतःच्या पातळीवर निर्णय घेऊन आपली भविष्यातील दिशा ठरवतील.

