नागपूर, २ एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतवर्षात शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवचरित्राच्या अध्ययनाने आपले त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले जातात. शिवचरित्र सतत संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांना युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरूष म्हटले जाते. एक व्यक्ती आणि राजाच्या रुपातील त्यांचे चरित्र म्हणूनच अनुकरणीय आहे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला. दिवंगत शिवचरित्र अभ्यासक आणि शिवव्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांच्या ‘नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ – युगंधर शिवराय’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते काल ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत मुधोजीराजे भोसले प्रमुख अतिथी होते. यावेळी व्यासपीठावर, या पुस्तकाचे संपादक डॉ. श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के, सुमंत टेकाडे यांच्या पत्नी माधवी टेकाडे उपस्थित होते.
काही लोक पृथ्वीतलावर एका विशिष्ट कार्यासाठी येतात आणि ते कार्य पार पडून आपला निरोप घेतात. शिवचरित्र अभ्यासक आणि शिवकथाकार सुमंत टेकाडे हे असेच एक व्यक्तिमत्व होते ज्याने या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज अनेक रूपांमध्ये लोकांपुढे मांडले ज्यामुळे महाराजांचे विविध पैलू आपल्यासमोर आले. प्रतिभावंतांनी हा विचार आत्मसात करून पुढे न्यायचा आणि समाज प्रबोधनाचे कार्य करायचे असे उद्गार परम पूजनीय सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिवंगत सुमंत टेकाडे यांच्या पुस्तक विमोचन प्रसंगी काढले.
शिवाजी महाराज हे युगंधर का ?
ज्या काळात इस्लामी आक्रमणाचा जगभर हाहाकार होता त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास जागवून व त्यांना एकत्रित आणून ही आक्रमक सत्ता परतवून लावली. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुखरूप परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही त्या काळातली एक महत्त्वपूर्ण घटना होती ज्यामुळे इतरांना मोठे बळ मिळाले व या प्रेरणातून इतर राज्यांनी देखील परकीय आक्रमणे आपल्या पराक्रमाने परतवून लावली. छत्रपतींनी धरलेली विजयाची लांबची वाट ही येणाऱ्या पिढ्यांची प्रेरणा स्त्रोत ठरली, जी आजतागायत कायम आहे. आधुनिक काळात रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद यांनी शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेला.
आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार, द्वितीय सर संघचालक श्री गुरुजी आणि तृतीय सर संघचालक बाळासाहेब देवरस या तिघांनीही हे सांगितले की संघकार्य व्यक्तीकेंद्रित नाही, परंतु संघ स्वयंसेवकांसमोर जर कुठला साकार आदर्श असेल तो पौराणिक काळात पवनसुत हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराजयांचा होय. स्वयंसेवकांसाठी आज शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. आपण व्यक्ती आणि राष्ट्र म्हणून त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराजांचा विचार हा काळापलीकडे होता. त्या काळात आपण ज्या बाबींमध्ये माघारलो होतो त्या त्यांनी विचारपूर्वक परत आणल्या. स्वराज्याच्या बळकटीसाठी त्यांनी आरमार उभारले, लांब पल्ल्यांच्या तोफा उभ्या केल्या, स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आणि कितीतरी बाबतीत स्वयंपूर्णता आणली.
समाजात न्याय आणि समता प्रस्थापित करणाऱ्या कल्पना त्यांनी त्या काळात प्रत्यक्ष राबवून दाखविल्या ज्याला आजकाल पुरोगामी आणि समाजवादी म्हटले जाते. मात्र हे सगळे करत असताना राष्ट्राविषयी त्यांची संकल्पना अतिशय घट्ट आणि आजच्या भाषेत नॉन निगोशिएबल होती.
शिवकथाकार किंवा कीर्तनकार जेव्हा एखादा विषय मांडतात तेव्हा ते विविध उदाहरणे प्रस्तुत करतात ज्यामध्ये युगपुरुषांचा उल्लेख असतो. युगपुरुषांचे कर्तृत्व आणि त्यांनी दाखवलेली वाट ही योग्यच असते त्यामुळे समाज मनावर त्याचा स्वाभाविक, सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या विषयाची कल्पना, सादरीकरणातली प्रामाणिकता, प्रभावी वाणी हे सगळे एकत्र आले तर तुम्ही त्या विचारांशी समरस होऊन अपेक्षित विचार समाज मनावर बिंबवण्यास सक्षम होता. सुमंतने त्याच्या हयातीत हे लिलया करून दाखवले.
शिवाजी महाराजांमुळे प्रभावित होऊन रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्यावर कविता लिहिली, स्वामी विवेकानंदांनीही शिवरायांच्या कथा सांगितल्या. दक्षिण भारतातील एक चित्रपट अभिनेता गणेशन यांनी शिवाजी महाराजांची भूमिका एका नाटकात केली तर त्यांचे नावही त्यावरून पडून शिवाजी गणेशन असे झाल्याचे भागवतांनी सांगितले. शिवरायांनी संपूर्ण राष्ट्राला प्रभावित केले आहे. पौराणिक कालखंडात हनुमान हे आपले आदर्श आहेत. तर आधुनिक युगात शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत.
शिवचरित्राला डॉ. सुमंत टेकाडे यांनी आपले जीवितकार्य का बनवले याचा आपण विचार करायला हवा असे भागवत म्हणाले. शिवचरित्र हे केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी नसून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आहे. डॉ. सुमंत टेकाडे यांनी शिवचरित्राच्या अध्ययनाचा आदर्श प्रस्तुत केला आहे. त्यांनी जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास केला तेव्हा ते शिवरायांच्या व्यक्तिमत्वाशी एकाकार झाले होते. त्यामुळेच ते जेव्हा शिवचरित्र सांगायचे तेव्हा त्यांचे शब्द थेट श्रोत्यांच्या हृदयाशी भिडायचे.