
दिल्ली, दि. ५ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 21, 22 आणि 23 मार्च 2025 रोजी बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे.
बैठकीत 2024-25 चे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक चर्चा करण्याबरोबरच विशेष कामांसाठीचे निवेदन करण्यात येणार आहे. येत्या विजयादशमी 2025 ला रा.स्व.संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त, विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. बैठकीत शताब्दी वर्षाच्या कार्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्याबरोबरच आगामी शताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रमाची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे.
बैठकीत राष्ट्रीय विषयांवरील दोन प्रस्तावांवर विचार करण्यात येणार आहे. तसेच संघ शाखांकडून आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासह पंचपरिवर्तनासाठीच्या प्रयत्नांची चर्चा विशेषतः अपेक्षित आहे. हिंदुत्व प्रबोधनासह देशातील सद्य परिस्थितीचे विश्लेषण आणि आवश्यक कृतींची चर्चाही बैठकीत होणार आहे.
संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय प्रतिनिधी, देशभरातील प्रांत आणि क्षेत्र स्तरावरील 1480 कार्यकर्ते अपेक्षित आहेत. या बैठकीत संघप्रणित विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
#ABPS2025 #RSS #SunilAmbekar #Bengaluru