भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेची मागणी; मुख्यमंत्र्यांना ९ मागण्यांचे निवेदन
पुणे, दिनांक १ मार्च : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराची घटना अत्यंत संतापजनक असून, बलात्काराच्या गुन्ह्यांना फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणी भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
यासंबंधी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मातृशक्तीने आपला निषेध आणि आक्रोश तीव्र शब्दांत व्यक्त केला. महिलांची सुरक्षा आणि न्यायिक प्रकरणांच्या कठोर उपाययोजनांसाठी नऊ मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेच्या मागणीबरोरच अत्याचारांच्या घटनंत एक महिन्यात न्याय, सार्वजनिक ठिकाणी पोलिस गस्त, पेट्रोलिंग व्हॅनमध्ये महिला कर्मचारी, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहांत महिला व्यवस्थापिका, पोलिस ठाण्यांत महिला सुरक्षा कक्ष आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने याची तातडीने दखल घेत कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती देशपांडे यासह मृणालिनी दातार, मेधा वैशंपायन, प्रज्ञा अग्निहोत्री, अनिता टेकवडे, प्रिया रसाळ, निलाक्षी गोडबोले, रंजना खरे, स्वाती टिळक, अनघा बिनीवाले, आशा साने, अपर्णा पाटील, प्रार्थना रसाळ, संपदा खोले आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी हे निवेदन स्विकारले.