भारताला ‘विश्वगुरू’च्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ संस्कृतीची आवश्यकता : राहुल सोलापूरकर

कोथरूड मध्ये ३५ व्या ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेला’ उत्तम प्रतिसाद

भारतीय संस्कृती संगमने आयोजित केलेली 'सांस्कृतिक व्याख्यानमालेत' बोलताना सुप्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया (उजवीकडे), भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर
भारतीय संस्कृती संगमने आयोजित केलेली ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेत’ बोलताना सुप्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया (उजवीकडे), भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर

पुणे दि. १० जानेवारी : भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य विचार सोडून आपली संस्कृती आणि परंपरा कशी विज्ञाननिष्ठ आहे हे लोकांना षड्-दर्शनाच्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ हिंदू संस्कृतीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य आणि सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

कोथरूड मधील आयडियल कॉलनीच्या क्रीडांगणावर भारतीय संस्कृती संगमने आयोजित केलेली “सांस्कृतिक व्याख्यानमाला” १० जानेवारी पासून सुरू झाली. ह्या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात राहुल सोलापूरकर यांचे ‘हिंदू संस्कृती, परंपरा आणि विज्ञान’ ह्या विषयावर भाषण झाले. अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया होते, तसेच व्यासपीठावर भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.

भारतीय संस्कृती संगम ने आयोजित केलेल्या 'सांस्कृतिक व्याख्यानमालेत' बोलताना सुप्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर
भारतीय संस्कृती संगम ने आयोजित केलेल्या ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेत’ बोलताना सुप्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर

राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले, ” ‘षड्-दर्शन’ हे हिंदू तत्त्वज्ञानाशी संबंधित संज्ञा आहे, ज्यात जीवनाच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांचा — विज्ञान, तत्त्वज्ञान, आचारधर्म, नैतिकता इत्यादीचा — विचार केला जातो. हे विचार कसे विज्ञाननिष्ठ आहे आणि त्याची सांगड वर्तमान काळाशी घालण्याचा प्रयत्न भारतीयांकडून झाला पाहिजे. हे करतच विश्वगुरूच्या दिशेने हा देश आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आणि हिंदू विचारांनी पुढे जावा.”

“सगळ्या जगाचं वैचारिक त्या-त्या धर्माच्या आधारित जाणारं अत्यंत लिनिअर, एका रेषेत आहे. पण आपली भारतीय संस्कृती, आपला विचार हा चक्रीय आहे. अद्वैत तत्त्वज्ञान वेदांपासून सुरु होऊन अध्यात्म मार्गातून आपल्यापर्यंत पोचलेलंच आहे. आपण जिला भारतमाता म्हणतो, तिच्या उज्ज्वल भवित्यव्यासाठी बुरसटलेले, पश्चिमेकडून आलेले ‘लिनिअर’ विचार सोडून, आपल्या “चक्रीय विचारांना” आपण पुढे नेणे आवश्यक आहे. हे नेत असताना खरंच आपला धर्म, आपली संस्कृती आणि परंपरा कशी विज्ञाननिष्ठ आहे, ह्याचे दर्शन जगाला आता घडविणे आवश्यक आहे. विश्वगुरूच्या दिशेने हा देश आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आणि हिंदू विचारांनी पुढे जावा,” असे राहुल सोलापूरकर म्हणाले.

“आपली संस्कृती पाच हजार वर्षांपेक्षा जुनी असा आपण म्हणतो. पण दुसरीकडे ती अत्यंत टाकाऊ, अतिशय असहिष्णू आहे, जुनाट आहे बुरसटलेली आहे असाही विचार मांडला जातो आणि हाच विचार घेऊन आपण सगळी कालगणना केली. परंतु वेद काळा पासून निर्माण झालेली संस्कृती आजही टिकून आहे. ह्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे ‘बदलला सामोरं जाणं’. परिवर्तन हा जगाचा कधीच न बदलता येणार नियम आहे आणि त्या परिवर्तनाला जे जे सामोरे जातात, तो बदल स्वीकारतात. आणि भारतासारखे पाया शाश्वत ठेऊन स्वीकारतात, तेच काळाच्या ओघात टिकून राहतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे.”

“गंगेच्या प्रवाह सारखी आपली भारतीय, हिंदू संस्कृती आहे. गंगा जशी हिमालयात प्रकट होते आणि खाली वाहत वाहत येत असताना तिला अनेक प्रवाह मिळत जातात, तशीच आपली संस्कृती आहे. हिंदू संस्कृती अनादी अनंत काळ पासून आहे. अनेक प्रवाह त्यात मिळत गेले, त्या प्रवाहांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सामावून घेतलं. गंगे सारखी आपली संस्कृती मोठी होत गेली आणि त्यातूनच आपल्या संस्कृतीच्या अद्वैताची वेगळी वाटचाल सुरु झाली, एकत्वाची वाटचाल सुरु झाली.” असे ते म्हणाले.

जग ज्यांना ‘एपिक’ संबोधतात त्या रामायण-महाभारत यांना आपण स्थान देतो, पण केवळ गोष्टी रूपात. त्यात असलेल्या तत्त्वज्ञान आणि जीवनातील दृष्टिकोन समजून, त्याच्या शाश्वत संदेशांना आजच्या काळाशी जोडून अधिक महत्त्व द्यायला हवं, असेही राहुल सोलापूरकर म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय चोरडिया म्हणाले की सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमात संस्कृती अभ्यासाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, कारण संस्कृतीशिवाय शिक्षण अपूर्ण असते आणि तीच समाजाची खरी ओळख आहे. “शिक्षण केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून, ते समाजाची मूल्ये, परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचे माध्यम असले पाहिजे,”असे ते म्हणाले.

डॉ. संजय चोरडिया यांनी आपल्या सूर्यदत्त संस्थेचे सभागृह सर्व सुविधांसहित हिंदू धर्म प्रबोधनासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी यांनी केले. श्रुती केळकर, उमेश सावरकर, मंदार पंडित, नुपुरा कामत यांनी “जयोस्तुते श्रीमहन्मंगले…” हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत सादर केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *