शिरवळ: एम.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरवळ आणि ग्रामपंचायत शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शिरवळ परिसरात ७५ हून अधिक देशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांच्या संवर्धनाचे नियोजनही शाळेमार्फतच केले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी दिली.
वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी शिरवळ ग्रामपंचायतीचे शिरवळ विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी मा. रविराज दुधगावकर, मा. राजेंद्रजी तांबे, मा. अनुपजी सूर्यवंशी, मा. राजेंद्र मगर, मा. अमोल कबुले, मा. सागर पानसरे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या आजीव सदस्या व शाला समितीच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, रा.स्व. संघाचे श्री. संदीप किन्हाळे, प्रवीण पाटील, नीलकंठ भूतकर तसेच पालकशिक्षक संघाचे सदस्य, शिरवळ ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्याच्या वातावरणाचे अनुकूल परिणाम हे या वृक्षारोपणाच्या उपक्रमावर होतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांकडून व्यक्त केला गेला.
या वृक्षारोपण कार्यक्रमात वड, पिंपळ, आंबा, चिंच, औदुंबर, आवळा, सीताफळ, सिसव इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली. शिरवळ पंचक्रोशीचा भाग हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असल्याने या उपक्रमाने काही प्रमाणात प्रदूषण रोखता येईल तसेच जमिनीची धूप कमी करण्यासाठी हा उपक्रम काही प्रमाणात फायदेशीर ठरेल, आणि शिरवळ गावाच्या विकासामध्ये शाळा व संस्था नेहमीच कटिबद्ध असेल, अशी ग्वाही संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांनी दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी आपल्या मनोगतात, वाढत्या शहरीकरणामुळे पशु-पक्ष्यांचा रहिवास कमी होत आहे, अशा उपक्रमामुळे या जैव विविधतेला हक्काचा अधिवास मिळून काही अंशी संरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शिरवळचे मा. सरपंच यांनीही शाळेला पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
या उपक्रमास श्री. अजय चौगुले यांनी मोफत पाणी टँकर पुरवला, विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम केला गेल्याने, विद्यार्थ्यांनाही पर्यावरण जागृतीचा संदेश मिळाला. सदर उपक्रमासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.