लोकमंथन 2024 – भाग्यनगर ठरणार एकतेचे दर्शन घडविणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवाचा साक्षीदार

भाग्यनगर : भारतीय विचारवंत, कलाकार आणि विचारवंतांना एकत्र आणण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’चे विचारवंत आणि अभ्यासकांचा संवाद ठरणाऱ्या 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या लोकमंथन 2024 ची तयारी सुरू असल्यामुळे भाग्यनगरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी टूरिझम प्लाझा येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत या आगामी महोत्सवाच्या तपशीलवार योजना आणि अपेक्षा मांडल्या.

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 22 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू 21 नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी सांस्कृतिक प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत 22 नोव्हेंबर रोजी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील आणि 24 नोव्हेंबर रोजी समारोप सत्राला संबोधित करतील.

तेलंगाणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन भाग्यनगर करणार असल्याबद्दल जी. किशन रेड्डी यांनी अभिमान व्यक्त केला. “भारतीय संस्कृतीतील आजपर्यंतच्या सर्वात भव्य उत्सवांपैकी एक” असे त्यांनी या महोत्सवाचे वर्णन केले.

लोकमंथनच्या स्वागत समितीचे अध्यक्ष असलेले रेड्डी यांनी या कार्यक्रमातील लोकसहभागाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आमच्या समितीत तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधील 120 हून अधिक मान्यवर सदस्य आहेत. यामध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते, विद्वान, स्थानिक कलाकार आणि सरकारी प्रशासकांचा समावेश आहे. लोकमंथन 2024 हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव बनावा यासाठी ते एकत्र आले आहेत.”

यंदाच्या “लोक अवलोकन: लोक विचार – लोक व्यवहार – लोक व्यवस्था” या संकल्पनेचे महत्त्व सांगताना नंदकुमार यांनी स्पष्ट केले की, “हे केवळ सांस्कृतिक संमेलन नाही. विचारवंतांना भारताच्या सांस्कृतिक मूल्यांबाबत चिंतन करण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीच्या भविष्याबाबत दूरदृष्टीला प्रेरणा देण्यासाठी लोकमंथन 2024 एक अवकाश पुरवेल. आपल्या सामायिक वारशाची सर्वांना आठवण करून देऊन विविधतेतील भारताची एकता आम्हाला समोर आणायची आहे.” भारतीय समाजातील विचार, वर्तन आणि शासन यांच्यातील गहन दुवे शोधण्यासाठी या वर्षीची संकल्पना आखण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

जागतिक परंपरांच्या दुर्मिळ मिलाफाच्या दर्शन घडविणाऱ्या लोकमंथन 2024 मधील असामान्य आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सादरीकरणावर जे. नंदकुमार यांनी प्रकाश टाकला. लिथुआनियाचे पवित्र रोमुवा अग्नी विधी, आर्मेनियातील ज्वलंत सन्स ऑफ सन वर्कशॉप, यझिदींच्या प्राचीन सूर्य उपासनेच्या पद्धती आणि प्रो. वायन डिबिया यांच्या पथकाद्वारे बालीतील रामायणाचे प्रसिद्ध केकक नृत्य हे यातील ठळक आहेत. या प्रदर्शनांमुळे एक अतुलनीय सांस्कृतिक अनुभव निर्माण होईल आणि भाग्यनगर हे जागतिक कलात्मक देवाणघेवाणीचे केंद्रस्थान बनेल, असे नंदकुमार यांनी भर देऊन सांगितले.

लोकमंथन 2024 मधील अपेक्षित ठळक बाबी

प्रज्ञा प्रवाह आणि प्रज्ञा भारती, तेलंगणा यांनी आयोजित केलेल्या लोकमंथन 2024 ची चौथी आवृत्ती, भारतीय सांस्कृतिक एकात्मतेच्या उत्सवात एक मैलाचा दगड ठरणार आहे. यामध्ये भारतीय परंपरांचे हृदय आणि आत्मा उलगडून दाखविणारे विविध कार्यक्रम असतील.

वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव: उपस्थितांना 1,500 हून अधिक कलाकारांचे सादरीकरण, तसेच तेलंगणातील प्रसिद्ध डोकरा मेटलवर्क, कोंडापल्ली खेळणी आणि कलमकारी वस्त्रापासून विविध लोकनृत्य, संगीत आणि कथाकथन परंपरांपर्यंतच्या 100पेक्षा अधिक पारंपारिक कला प्रकारांचे प्रदर्शन अनुभवायला मिळेल.

2,500 हून अधिक प्रतिनिधी आणि 1 लाख दैनंदिन अभ्यागतांचा मेळा: या महोत्सवात प्रदर्शन, ऑडिओ-व्हिज्युअल पॅव्हेलियन आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेले लाइव्ह परफॉर्मन्स यासारख्या उपक्रमांमुळे हजारो प्रतिनिधी आणि अभ्यागत आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे.

नंदकुमार यांनी विविध प्रदर्शनांच्या अधिक तपशीलवार माहिती दिली. यामध्ये इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या वनवासी संस्कृतीवरील विशेष फोटो प्रदर्शन तसेच वनवासी स्वातंत्र्यसैनिकांवरील प्रदर्शनाचा समावेश आहे.

तेलंगणाचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासोबतच, लोकमंथन 2024 मध्ये छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि इतर राज्यांतील मंडप असतील. यात त्यांच्या विशिष्ट परंपरा, खाद्यपदार्थ आणि उपचार पद्धती पाहायला मिळतील.

“हा कार्यक्रम म्हणजे भारताच्या सांस्कृतिक परिदृश्याचा एक अस्सल अनुभव आहे,” असे नंदकुमार पुढे म्हणाले. तसेच पर्यावरण विषयक जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव प्लास्टिकमुक्त असेल यावर त्यांनी भर दिला.

किशन रेड्डी म्हणाले, “लोकमंथन 2024 हा केवळ उत्सव नाही; हा एक मैलाचा दगड आहे. आपल्या सामायिक सांस्कृतिक मुळांमध्ये असलेल्या अचाट सामर्थ्याची आठवण करून देणारा हा मेळावा आहे. भाग्यनगरमध्ये आपण भारताची एकता पूर्वी कधीही नव्हे एवढी साजरी करू.”

लोकमंथन 2024 हा संपूर्ण प्रदेशात उत्कंठा वाढवणारा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा उत्सव आणि उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकासाठी जीवनात एकदाच मिळेल असा अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *