पुणे : थोर इतिहास संशोधक व कला, साहित्य संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे सरदार कै. गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळात २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांना आबासाहेब मुजुमदारांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बी. डी. कुलकर्णी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
या प्रसंगी प्रदीपदादा रावत म्हणाले की, गेल्या शंभराहून अधिक वर्षे मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे कार्य करणाऱ्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या जडणघडणीमध्ये सरदार आबासाहेब मुजुमदारांनी मोठे योगदान दिले आहे. इतिहास संशोधनासारख्या गहन विषयाबरोबरच हिंदुस्थानी संगीत हा विषयही त्यांनी सहजतेने हाताळला. ललित साहित्य, भारतीय कला अशा विविध विषयांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवून नवी दिशा देण्याचे कार्य केले. आबासाहेबांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात दिल्ली असेंब्लीमध्ये पुणे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक समस्या मांडून जनतेला न्याय मिळवून देणारे ते एक आदर्श लोकनेता होते. आबासाहेबांचे हे अष्टपैलू जीवनदर्शन सार्वजनिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक आहे.
आबासाहेबांच्या नातसून श्रीमती अनुपमा मुजुमदार यांनी अनेक घटना सांगून आबासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या व त्यांच्या नावाने चालू असणार्यान अनेक प्रकल्पांची माहिती सांगितली.
भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी आबासाहेबांनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. पुरस्कारार्थी महेश तेंडुलकर यांनी आबासाहेबांसारख्या महान संशोधकाच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मला भविष्यात संशोधन कार्याची प्रेरणा देणारा असेल.