Thursday, September 19th, 2024

सेवा वस्तीतील ३१ जोडप्यांनी केली गणपतीची सपत्नीक आरती

पुणे, दि. १९ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त पुणे महानगरातील सर्व भागातील सेवा वस्तीतील ३१ नागरिकांनी सपत्नीक समरसता आरती केली. महानगर समरसता गतिविधीच्या माध्यमातून या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

कसबा, मंडई, केसरीवाडा, दगडूशेठ हलवाई, गुरुजी तालीम या मंडळांमध्ये ‘आरती समरसतेची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुमठेकर रोड वरील ऐतिहासिक वारसा असलेल्या विंचूरकर वाड्यातील गणपती मंडळात झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचा समारोप झाला.

यावेळी समरसता गतिविधीचे पुणे महानगर संयोजक शरद शिंदे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. डॉ. खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर कुंभार यांनी सर्वांना मिळून मिसळून राहत समरसता कशी जपावी याविषयी मार्गदर्शन केले. श्री नारायण महाराज गोसावी यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.

सर्वांच्या हस्ते गणपतीची एकत्रित आरती करण्यात आली. यावेळी सर्व जोडप्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पुणे पिपल्स बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. सुभाषराव मोहिते, महानगर सह कार्यवाह प्रसाद लवळेकर, रवि ननावरे, अनिल भस्मे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *