२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी | चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती

जळगाव, १३ फेब्रुवारी : चित्रपट क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या युवकांना हक्काचे व्यासपीठ म्हणून अजिंठा फिल्म सोसायटीद्वारा प्रतिवर्षी आयोजित होणारा देवगिरी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव यंदा कान्ह ललित कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ दरम्यान जळगाव येथील मु.जे.महाविद्यालय परिसरातील कान्ह ललित कला केंद्र येथे संपन्न होत आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन दिवस संपूर्ण खान्देश वासियांना देश विदेशातील अत्यंत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
यंदाच्या महोत्सवात कुटुंब, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्व – बोध या विषयांच्या शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी बाल फिल्म कॅम्पस फिल्म संपूर्ण देशभरातून सहभागी झाले आहेत या दोन दिवसीय महोत्सवात यांचे प्रदर्शन केले जाणार असून चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि देशभरातील युवा चित्रकर्मी आपल्या कलाकृतींसह या महोत्सवात सहभागी होत आहेत. चित्रकर्मींना चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे मार्गदर्शन म्हणून विविध विषयांवर ४ मास्टर क्लासचे आयोजन महोत्सवादरम्यान केले जाणार आहे. चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे टुरिंग टॉकीजचे देखील आयोजन महोत्सवात होणार आहे.
महोत्सवाचा उद्घाटन व समापन सोहळा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. अजिंठा फिल्म सोसायटीद्वारा देण्यात येणाऱ्या योफिमा शिष्यवृत्ती योजनेच्या विजेत्या फिल्म्सचे स्क्रिनिंग देखील या दरम्यान करण्यात येईल. तसेच हे सर्व विजेते फिल्म मेकर्स ओपन फोरमच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधणार आहे. प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या देवगिरी चित्र गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १ मार्च रोजी समापन सत्रात केले जाणार आहे. महोत्सवातील विजेत्या लघुपटांना २ लाखांच्या वर रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या संचाला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना केली गेली असून तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी जैन उद्योग समूह, रामलाल चौबे ट्रस्ट यांंसारख्या संस्थांचे पाठबळ लाभत आहे. सदर महोत्सवात प्रवेश सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. जळगाव सह परिसरातील नागरिकांनी २ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटी व महोत्सव आयोजन समिती द्वारा करण्यात आले आहे.

