देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि भोपाळला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, सर्व भ्रष्ट लोकं आहेत. अनेकांची माहिती आमच्याकडे आहे. माझं मोदी साहेबांना नम्रतेने सांगणे एकच आहे, जर या ठिकाणी कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याविरुद्ध तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही स्वतः काय घेणार? हे सबंध देशाला सांगा. खोटे आरोप करणं ही गोष्ट आज आपल्या हिताची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. शरद पवार हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून जालन्याचा दौरा आटोपून ते काल जळगाव येथे गेले होते. जळगाव येथे पवारांची ‘स्वाभिमान सभा’ पार पडली. या सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी आम्ही दोघेही जालन्याला गेलो. तिथल्या शेतकऱ्यांनी उपोषण केलं, मागणी साधी होती. या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठी हल्ला झाला. लाठी हल्ल्याला काहीच कारण नव्हतं. स्त्री-पुरुष जखमी झाले, लहान माणसं जखमी झाली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये आंदोलनं सुरू झाली असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षांना राज्यातील दंगलींना जबाबदार धरले. जालन्यातील आंदोलन हे मराठा आरक्षणासंदर्भात होते मात्र पवारांच्या भाषणात शेतकरी आंदोलन असा उल्लेख प्रामुख्याने आला.
दरम्यान याच सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, चोपडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत बारेला व कोथवड शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते संजय माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.