बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचं प्रतीक असून बहीण, भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
रक्षाबंधनाचा सण बहिण-भावाचं प्रेम आणि विश्वासाचं द्योतक असून जनतेच्या जीवनात आनंद आणणारा आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण आणि भावामधला अतूट विश्वास आणि अपार प्रेमाला समर्पित असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आपुलकी आणि सौहार्दाची भावना प्रगल्भ करेल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्तानं दिल्लीतल्या निवास्थानी शालेय विद्यार्थींनींनी प्रधानमंत्र्यांना आज राखी बांधली. तसंच प्रधानमंत्री कार्यालयात काम करणारे सफाई कामगार, शिपाई, चालक आणि माळ्यांच्या मुलींकडून देखील मोदी यांनी आज राखी बांधून घेतली. रक्षाबंधनाच्या निमित्तानं निरनिराळ्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत आहे. आजचा नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव देखील पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करत आहेत. या सणानिमित्त नवी मुंबई शहरातले कोळीवाडे आणि होडया सजल्या आहेत. शहरातल्या ऐरोली, दिवा, वाशी, सारसोळे, घणसोली, बेलापूर इथल्या दिवाळे गावातल्या कोळीवाडयातल्या बांधवांनी किनाऱ्याला नांगरुन ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करून त्या सजवलेल्या आहेत. आजच्या दिवशी कोळी बांधव त्यांच्या अन्नदात्या सागराची पूजा करून त्याचा आशिर्वाद घेतात आणि मासेमारीला सुरुवात करतात.
रायगड जिल्ह्यातल्या पेण मधल्या तरणखोप गावात आदिवासी आश्रमात आदिवासी मुलांनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. अंकुर ट्रस्ट संस्थेंमार्फत हा उपक्रम राबवण्यात आला.या वेळी डाॅ.वैशाली पाटील यांनी वातावरण बदलाचे परिमाण म्हणून निसर्गाची जोपासना करा आणि वृक्ष लावा हा संदेश सर्वांना दिला. रक्षा बंधनाचं औचित्य साधत खासदार डॉ हिना गावित आणि त्यांच्या भगिनी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी नंदुरबार इथं सामुहीक रक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा केला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात आपल्या मतदार संघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत आपलं विकासाचं जिवाभावाचं नातं असल्यानं या दोन्ही भगिनींनी सामुहीक रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला आहे. यावेळी जिल्हाभरातून अनेकांनी खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांकडून राख्या बांधण्यासाठी गर्दी केल्याचं आमच्या बातमी दारानं कळवलं आहे.