‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर मुख्यमंत्र्यांचा संवाद

नवी दिल्ली, दि. २० फेब्रुवारी : जगभरातील अन्नसाखळीवर वाढता ताण, हवामान बदलाचे गंभीर परिणाम, पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक आहे. अनेक देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ येथे ‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर फडणवीसयांनी आज संबोधन केले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि जबाबदार AI ला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महा कृषी AI धोरण (2025-29)’ची माहिती दिली. AI आधारित मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे स्थानिक हवामानाचा अंदाज, कीटक नियंत्रण, सिंचन-खत व्यवस्थापन, बाजारभाव माहिती आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. जिओस्पेशल एनालिटिक्सच्या माध्यमातून कापसावरील अळीचा वेळेपूर्वी इशारा देऊन नुकसान कमी करण्यात यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
राज्यात ‘Agriculture Data Exchange’ विकसित होत असून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात आहे. यामुळे अन्नसुरक्षा, निर्यात आणि ग्राहकांचा विश्वास बळकट होणार आहे. 150 लाख हेक्टर शेतीक्षेत्र, अग्रगण्य कृषी विद्यापीठे आणि सक्षम स्टार्टअप परिसंस्था असलेल्या महाराष्ट्रात AI आधारित कृषी परिवर्तनासाठी मोठी क्षमता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अन्नसुरक्षा, हवामान सक्षमता, महिला सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धीसाठी AI निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र शासन केंद्र सरकार, जागतिक संस्था, संशोधक, गुंतवणूकदार आणि शेतकरी संघटनांसोबत सहकार्याने या परिवर्तनाला गती देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

